आमदार विलास भुमरे यांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी मंजूर
पैठण (प्रतिनिधी) पैठण विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना नवसंजीवनी देणारा निर्णय घेण्यात आला असून, आ. विलास भुमरे यांच्या अथक प्रयत्नातून पैठण शहासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पैठण शहरातील विविध मूलभूत सुविधा उभारल्या जाणार असून यामुळे नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होणार आहेत.
या निधीतून नगरपरिषद हद्दीत अभ्यासीका बांधकाम व फर्निचर खरेदीसाठी एक कोटी रुपये, तसेच तरुणांसाठी आधुनिक व्यायामशाळेचे बांधकाम आणि अत्याधुनिक व्यायाम साहित्य बसविण्यासाठी दीड कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे पैठण शहरातील युवकांना फिटनेससाठी सुसज्ज व्यायाम सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच शहरातील धार्मिक व सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्मशानभूमींमध्ये आवश्यक आहे. सुधारणा आणि विकास कामे करण्यात येणार आहेत.
यामध्ये सिद्धेश्वर स्मशानभूमी अंतर्गत कामांसाठी १ कोटी रुपये, नागघाट स्मशानभूमीच्या विकासासाठी ७० लाख रुपये, तसेच महादेव मंदिरासमोरील सिद्धेश्वर स्मशानभूमी विकसीत करणे ५० लाख व शासकीय रुग्णालयासमोरील सात बंगला स्मशानभूमी विकसित करण्यासाठी ३० लाख रुपये असे कामे समाविष्ट आहेत. या सर्व कामासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. शहराचा सर्वांगीण विकास साधण्याच्या हेतूने हा निधी मंजूर केल्याचे आ. विलास भुमरे यांनी सांगितले.
पैठणला आदर्शनगर बनवणे हेच माझे ध्येय : आ. विलास भुमरे
पैठण शहर हा आपल्या संतपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारसाचा अभिमान आहे. येथे नागरिकांना दर्जे दार सुविधा मिळाव्यात. शहर आधुनिक व सुबक व्हावे, या उद्देशाने मी सतत प्रयत्न करत आलो आहे. या पाच कोटींच्या निधीतून शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे आता पूर्णत्वास जाणार आहेत. तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा, अभ्यासीका इमारत, तसेच विविध स्मशानभूमींचा विकास या माध्यमातून पैठणच्या सर्व स्तरांतील नागरिकांना थेट लाभ मिळणार आहे. शहराचा चेहरा बदलणे, नागरिकांना सुविधा देणे आणि पैठणला आदर्शनगर बनवणे हेच माझे ध्येय आहे. यासाठी राज्य शासनाचा पूर्ण सहकार्य लाभत असून, सर्व कामांना लवकरच गती दिली जाईल. पैठणच्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा हेच माझे बळ आहे. आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प पैठणसाठी आणण्याचा माझा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे पैठणकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी आ. भुमरे यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले आहे.












